तुमचा मित्र..

होय मला आता आत्महत्या करावीशी वाटतेय.
   एकदम भयानक अंगावर काटा आला का असं एखाद्याला अविचारी वाटू शकतं ? अत्यन्त हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतुन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून परत कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेणारा हा मुलगा, मी हा समोर विचार व्यक्त करणारा मुलगा पाहतोय त्याला ऐकतोय , त्या मुलाने आपल्या या कष्टाळू जीवनात प्रसंगी एक वेळची मिसळ खाऊन आपले शिक्षण पूर्ण केले आहे, परंतु एका ही अतिरिक्त रुपयाचा मोह नसणारा हा मुलगा , नोकरी करता करता ज्याने शिक्षण पूर्ण केले आणि त्या शिक्षणाच्या आणि अनुभवाच्या बळावर त्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले अशा शिक्षणाच्या साथीने काम करता करता ज्युनिअरशीप ही पूर्ण करून त्याच्या अनुभवाच्या आधारे तो भविष्य आखणारा अभागी , असा अचानक विचार कसा करू शकतो ?
   कोणा व्यक्तीच्या स्तुतीचा प्रपंच इथे नाहीये पण कोरोना आणि थांबलेले अर्थचक्र आणि घरची गरिबी, पुन्हा मला मागे जायचे नाही ही मनाची धारणा, आणि लेखणी आणि कुदळ ह्या दरम्यान अडकलेला, एक अभागी जीव. त्यामानाने माझ्या घरची परिस्थिती मध्यमवर्गीय होती माझ्या पाठीशी वडिलांची आर्थिक पुंजी होती मी स्वतःला काही अंशी नक्कीच धन्य आणि पुण्यवान समजतोय.
     कठीण प्रसंगातून मार्ग काढणारा हा तरुण असा अचानक त्याचे विचार माझ्यासमोर व्यक्त करतोय, खरतर मी , सरकार , अथवा परिस्थिती अशा मानसिकतेला बदलू शकत नाही. कारण अशा व्यक्तीची मानसिकता ही गुंतागुंतीची असते , हट्टी असते , भावनिक असते , आणि तेवढीच टोकाची व्यवहारी आणि क्रूर , स्वभाव गुंतागुंतीचा आणि निर्मळ मन त्वरित प्रतिक्रिया देण्याची वृत्ती आणि ठाम भूमिका जणूकाही समुद्रात हेलकावे खाणारी नाव , त्यांच्या नौकेला आमच्यासारखे शीड नाही वारा घेऊन जाईल तिकडे ते वाहणारे नाहीत धडपडत  नावेत भरलेले पाणी ( टेन्शन , समस्या ) उपसत ते हट्टाने आपल्या किनाऱ्याच्या दिशेने मार्गक्रमण करणारे ,त्याच काय पुढे होईल, मित्र असला तरी मला त्याच्या नित्यनैमिक कार्यावर लक्ष ठेवणे शक्य होणारे नाही.. असे कितीतरी मनुष्यजीव आहेत ते ह्या परिस्थिती खचलेले आहेत पाठीमागे आधार नसलेले पळत आहेत समोरच्या काळोख्या खाईच्या दिशेने , काही रस्त्यात दम तोडतील काही लढा देतील काही थकतील आणि अवलंबतील नशिबाचा मार्ग, मी , मी मात्र ह्यांच्या गर्दीत कुठेतरी असेन, कोणासोबत तरी, सगळ्यांचच वर्तमान नाही माहीत मला , पण आपल्यापैकी काहींचा भूतकाळ छान आणि सुखाचा होता ह्याची मात्र आपल्या इतिहासात नोंद होईल हे नक्की.

तुमचा एक मित्र.

Comments