वाढीव मराठी ..

अरे त्या " अठ्ठेचाळीस बंडू " कडे एक काम आहे जरा त्या मसनवटया आगारात पाणी आहे का ते बघायचंय , अस स्वगत बोलून राजा भावे ने आपल्या हाटेलच्या पोऱ्याला बागेतल्या सुखडी आणायला पिटाळले. वास्तविक मुरुड हे गाव " टोपण " नावांसाठी जितके प्रसिद्ध तितकेच त्यापेक्षा अधिक टोपण नावे तिथून पुढे अवघया चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्दे गावात आपल्याला ऐकू येतात. मजेशीर नावांचा संग्रह करायचा तर विनोदांनी कित्येक पाने भरतील आणि हास्याच्या फवाऱ्यांची आवर्तने होतील. मुरुड गावात " अठ्ठेचाळीस बंडू " , "प प प पाऊस " , आजा " विज्या रंजा " अशी पंचायतीमधील तिघाडी न कामाची बिघडी , नाक्यातला कुप्रसिद्ध नथनी बाज "नत्थु" , आपल्या कु - कर्तृत्वाने कुप्रसिद्ध असलेला " रावन " तसेच प्रत्येक कामात आपल्या खिश्याचे वजन तोलणारा तसेच गावातील आघाडीच्या राजकीय नेत्यांचे यथेच्छ कौतुक करून आणि साधारण मतमतांतरांचा कौल बघून आपले विचार कमालीचे आडवळणाचे आणि लवचिक ठेवणारा " एजंट " , आपल्याच धुंदीत आणि आपल्याच लयीत राहणारा " आप्प्या ", तर उगाचच दादागिरी आणि आपल्या धूर्त चालींनी अस्थितवात नसलेल्या आणि असलेल्या संशयित शत्रूना ओळखून त्यांच्यावर उगाचच डाफरणारा " कांच्या भाय " , जिकडे जावे तिकडे आपले हित पाहणारा आणि कोणत्याही सामाजिक काम करण्यासाठी कायम पुढे राहून आपल्या पोटापाण्याच्या ही सोयीची काळजी करणारा " फोल्यानं " , मधल्या खांडवातील समस्त खालच्या पाखडीतली राजकारणाचा सारीपाट ज्या छपराखाली चालला आणि पुढे ही चालतोय ती प्रसिद्ध " व्हाइट हाऊस वास्तू " , म्हणजेच " भावे सेंट्रल " आणि त्याच्या बाजूलाच राहणारा मुरुड गाव म्हणजे समस्त हस्तिनापूर नगरी आणि त्या नगरीतील सगळ्या राजकारणाचे अचूक विवेचन करून आपलया दूरदृष्टीने आपले डाव अचूक मांडणारा "संजय". त्यात भरीस भर म्हणजे त्या हस्तिनापूर नगरीच्या ह्या दूरदृष्टी असलेल्या त्याच समरजोगुणांनी युक्त असलेली व्यक्ती म्हणजे "कलुशा कबजी ", अशी ओळख सांगणारा "नाना",   किंबहुना ह्या सगळ्यांत फक्त "अठ्ठेचाळीस बंडू " आणि " बगा " , आणि सगळ्यांचा लाडका "बाळ्या" वगळता सगळेच राजकारणातील कधीही पुढील घरात जाऊन वजीर होण्यास तत्पर असलेले प्यादे.
ह्या गावाचा आणि त्या पाखडीतली पंडितांचा महिमा काय वर्णावा !     ह्या शब्द पंडितांनी "पलायन " आणि " पल्यान" ( प्लॅन ) असे दोन चुलत विरुद्धार्थी शब्द तयार करून आपल्या बहुसंख्य मताने ठरलेल्या कोणत्याही कामात ( प्लॅन ) सुरुवातीलाच पलायनाचा नारळ फोडण्याची व्यवस्था केली.
         पण , पण कर्दे गावात राजकारणाशी निगडित आणि त्याच्या खेळीच्या अवघड वळणाची आकडेमोड करण्यात लोक मात्र फार काळ रमत नाहीत . आणि म्हणूनच तेथील टोपण नावे मनाला निखळ आनंद मिळवून देतात. मुळातच कष्टकरी समाजजीवन आणि जमीन , कला , व खेळा शी घट्ट नाळ ह्या नावांच्या उच्चरांच्या चढउतारात आपल्याला दिसून येते. कायम लाथ मारली की पकड होणार अशी आपली फसगत करून घेणारा "खेकडा" माने , आपल्या तंद्रीत मदिरेच्या नशेत हाताजवळ असेल ते वाजवणारा "बाजा" कोंडकर ,  कधीही खिशात आठ आणे ही नसणारा आणि खर्चा ची वेळ आली आपल्या हाल्फ पॅन्ट चे खिसे उकलून दाखवणारा "सुख्खा सरपंच", खरतर कर्दे गावात दोन व्यक्ती राकेश नावाच्या, त्यातला एक राकेश आणि दुसरा " ऍक्टचुली राकेश " त्याला कायम कोणत्याही वाक्यपुढे ऍक्टचुली बोलायची सवय म्हणून तो "ऍक्टचुली राकेश" …
           ह्या सगळ्या नामसागरात आपण फिरलो बागडलो की , गमतीचे आणि निखळ विनोदी नामे आपणाला सापडतात आणि क्षणभर आपली करमणूक करून जातात. खरतर माझ्याकडून वयक्तिकरित्या कायमच दोन नावे ऐकली की पुढे तक्षणी हसू ही क्रिया आपोआप घडते ती दोन नावे म्हणजे "प्रताप" आणि "प्रकाश" ह्या दोन नावे धारण करणाऱ्या अभागी जीवांचे पिता आणि पिता पुत्रांची ओळख करून देणारा तो अनोळखी मनुष्य जीव हजारो विनोद पचवून किंचितही न हसणारा असा हवा. स्त्री टोपण नावांची यादी माझ्याकडे दुर्दैवाने उपलब्द नाही पण आसूड गावातील एका भाग्यवान नवऱ्याने आपल्या प्रिय पत्नीचे नाव "सुविधा" असे ठेवले आणि त्याचे प्रियजन त्या उभयतांची ओळख " हे ______ हे , आणि ही त्यांची " सुविधा " अशी करून देतात आणि ते ऐकणारे न हसता फक्त थोडं ओळखण्याच स्मितहास्य ठेवतात ते व्यक्ती म्हणजे साक्षात ज्ञानी असो वा अज्ञानी पण कोणत्याही विनोदी वाक्याची जाण नसलेले भाषेचे "कर्मदारिद्रीच". 
     असो ,माझ्या मराठी भाषेचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे पुरेसा शब्दसंग्रह नाही ,  पण मराठी भाषेच्या ह्या विकासात समस्त महाराष्ट्रातील गावांमधील जनांच्या टोपण नावांची भर आणि त्या नावांचा इतिहास हा एक वेगळा अध्याय नक्की ठरेल ह्यात शनका नाही. ( सदर गाव व पात्रे काल्पनिक असून सत्याशी त्याचा काडीमात्र संबंध नाही )

Comments