देवाचे अस्तित्व..
आस्तिक - नास्तिक विचारांच्या माणसांचे समूहगट स्वतःमधील विचारांची भिंत नेहमीच अधोरेखित करीत असतात. साधारणतः एक गोष्ट या दोन विचारांमधील सारखी असते ती म्हणजे " विश्वास ". ह्या दोन विचारांमधील फरक जरी विचारात घेतला तरी विश्वासासारखी एकच समान गोष्ट ह्यांना एका विविक्षित क्षणी एकत्र आणते. ह्या दोन्ही मतमतांतरात जेव्हा वादाची बिना - निर्णय समाप्ती करण्याची वेळ येते तेव्हा " एकमेकांचे विचार करण्याची दिशा " आणि ' एका अज्ञात गोष्टीवर विश्वास. आस्तिक ' ईश्वरी अंशावर ' विश्वास ठेवतो तर नास्तिक फक्त ' कर्मावर' ", .त्यातही ह्यातूनही जे आस्तिक ' ईश्वरी उपासनेला कर्माची जोड ' वैगरे म्हणत असतील तर ते ढोंगी आस्तिक म्हणता येतील. आस्तिक म्हटला की फक्त डोळे झाकून ईश्वरावर विश्वास ठेवणाराच. त्यातही बहुतांशी कट्टर आस्तिक जगातील आणि घरातीलही कोणत्याही शुभ घटनेला ईश्वराचा आशीर्वाद किंवा ईश्वरी कर्तृत्व म्हणतात आणि अशुभ घटनेला त्याच्या विरोधी उपमा देतात. आस्तिकांची दुनिया निराळीच, ते झोपून उठल्यानंतर आणि झोपायच्या आधी देवाला असंख्य वेळा नमस्कार करतील आणि देवाचे असंख्य वेळा नामजप करतील. अस्तिकांचा सर्वात कट्टर वर्ग तर देवाच्या मोबाईलमधील फोटोलाही नमस्कार करताना दिसतो.
आजतागायत मानवाच्या कैक पिढ्या अनंतात विलीन झाल्या. ' देव ' ह्या संकल्पनेचा शोध कसा लागला ! कधी लागला ! आणि कोणी लावला ! ह्या प्रश्नांची उत्तरं आजपर्यंत कोणी शोधण्याचा प्रयत्न केला नाही आणि असा कोणी केलाय असे ऐकीवातही नाही. लाखोंच्या संख्येने नामजप करणारा वर्ग आणि त्याची जाहिरातबाजी करणारा वर्ग हे आस्तिकांमधील उच्च असे म्हणता येतील की, जे अस्तिकपणा वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात आणि एखाद्या ढोंगी बुवाच्या किंवा बाबाच्या आहारी जातात. न जाणो किती आस्तिक असा आपला काळ, वेळ, आणि अर्थाला अशा ' सन्मार्गी ?' खर्च करीत असतील आणि कितितरी आस्तिक आपल्या संकटमय परिस्थितीला देवाची इच्छा म्हणून मान्य करीत असतील. बहुसंख्य वेळेला अस्तिकांच्या वादात ' भगवंताची इच्छा ' अशा उच्चराने वादाचा शेवट होतो आणि परस्पर पुन्हा उभयतां चहापानाने वादकार्यक्रमाची सांगता होते.
आस्तिकांची कायम एक अदृश्य संघटना असते की जी नास्तिकांच्या बरोबर वादात अस्तिकाला साथ करते. आस्तिक विचारांची अदृश्य संघटना प्रत्येक मनुष्याला दिसत नसली तरी त्या त्या विचारांच्या वादात तिचे अस्तित्व दाखवून देते. कट्टर आस्तिक आर्थिक स्थितीने मजबूत नसून मध्यमवर्गीय व खाऊन पिऊन सुखी ह्या सदरात मोडतात यात कळस म्हणजे तुम्ही कोणत्याही अस्तिकाला विचारलंत तर तो ही ' खाऊन पिऊन', ' ईश्वरी कृपेने ' सुखी अस उत्तर देतो. ह्यातला मतितार्थ सोडला तरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आर्थिकदृष्टया हलाखीची स्थिती असलेला कोणताही व्यक्ती अथवा त्याचे कुटुंब हे आस्तिक नसते हे चहुबाजूला आपण पाहिल्यास आणि जाणून घेतल्यास आपणाला कळेल.
नास्तिक वर्गाचा विचार केल्यास त्या वर्गाची संघटना आपणाला जाणवत नाही. नास्तिक संघटित कधीच राहत नाहीत त्यांचे विचार ते मुद्दामून प्रदर्शित करीत नाहीत. कधी देवाधिदेवांचा मुद्दा चर्चेत आलाच की ते त्यात उडी घेतात आणि आस्तिक नाजूक / मोडका विचार ते क्षणार्धात तुडवून टाकतात. ते कोणत्याही धर्मातील देव ह्या संकल्पनेला मानत नाहीत आणि ढुंकूनही तिकडे पाहत नाहीत तसेच ते देवांचे देवळातील किंवा प्रार्थनागृहतील कार्यक्रमात फक्त ' भोजन प्रियते ' ह्या उद्देशाने सहभागी होतात.
नास्तिक ह्या संज्ञेत भर म्हणजे ' जो ईश्वरी अंशाला मानत नाही तसेच ईश्वरी अंश विरुद्ध असा अदैवी विचारांचा अंश हे दोन्हींचे अस्तित्व आहे असे मानत नाही , तो आणि तोच खरा ' हाडाचा नास्तिक ' म्हणता येईल. नास्तिक म्हणजे, अटीतटीची कोणत्याही गंभीर परिस्थितीत देवाचे नाव न घेणारा, काळोख्या रात्रीत आणि एकटेपणाचा काळात देवाचे नाव न उच्चणारा.आस्तिकांची धारणा आणि आस्था असलेल्या ठिकाणांचे आणि काही अलिखित नियमांचे पालन न करणारा आणि तरी ही आपल्या धर्माशी कट्टर राहणारा तोच खरा नास्तिक.
आस्तिक नास्तिक विचारांच्या दोन टोकांत समान धागा तो म्हणजे ' विश्वास ' तो वगळला तर मध्ये लटकणारे असंख्य वैचारिक जीव हे समस्त मानवजातीमधील " ढोंगी " ,व " लबाड " . सदर दोन विचारांच्या विरोधी टोकात असणारे आस्तिक, फसवले जाणारे , भावनिक, आणि नास्तिक बहुतांशी प्रमाणात न फसणारे , कर्मनिष्ठक्रूर असे व्यक्ती म्हणता येतील. बाकी दोन सवती जशा एका संसारात न भांडल्याशिवाय राहत नाहीत त्याचप्रमाणे आस्तिक व नास्तिक लोक जगातल्या व गल्लीतल्या कोणत्याही व्यासपीठावर वैचारिक वाद केल्याशिवाय एकत्र नांदू / राहू शकत नाहीत.
@ Adv Hrishikesh Vaishampayan..
Comments
Post a Comment