सौरभ 😌💐

               “ वैशंपायन साहे S S S ब ” !!!!, “ अप्पर कलेक्टर “ बेलदारसाहेबाने माझी यथोचित साहेब साहेब करुन इभ्रत काढलीच होती, त्यातच खाली रजिस्टर ऑफिसला असलेल्या ह्या महोदयांची हाक!  डोकं तापलेलं होत, पण त्याच्याकडे पाहिलं आणि अर्धा त्राण कुठल्या कुठे पळाला.

             “ साहेब, आमच्या हॉस्टेल चे विद्यार्थी तुम्ही, काही लागलं तर बिनधास्त सांगां हा ! रेक्टर नी दादागिरी केलन तरी ___ सारू चांगलाच ! सौरभ च्या त्या वाक्यानी मोठा हुरूप आला मला.. हॉस्टेलला असलो की चुकलो नियम मोडला तर रेक्टर काढून टाकेल, तिथून सुटतो तर उशीर झाला म्हणून सरांचीं ओरड ऐकायची, तिथे काम चुकलं तर सहन नं होणारा अबोला, तिथून सुटलो, कोर्टात गेलो की, तिकडे नुसती धावपळ आणि न चुकता क्षणाक्षणाचे रिपोर्टींग, पोटापाण्याचे एल लागलेलेचं.. सिगरेट थोटका जवळ नं पोहोचताच आणी चहाच्या त्या काचेच्या ग्लासाचा तळ नं लागताच नुसती पळ काढायला लावणारी जिंदगी… ह्या ताणतणावात माझ्या आयुष्यातला हास्य राग हा जवळजवळ संपल्यातच जमा होता.. पांचट विनोदाचे घडगेच्या घडगे फोडणारा माणूस मी, या कागदपत्री कटेकोर नियमात आणी कायद्याच्या बडगात खितपत कधी रुतून गेलो ते कळलंच नाही.. 

           सौरभ च्या त्या आवाजाने आणी काही क्षणांच्या त्या कानावर येणाऱ्या हास्याने मला मात्र मनोमन आश्चर्य वाटे. पांढरा कपडा चढवाणारा हा प्राणी हसतो तरी कसा ? मला कायम भेडसावणारा प्रश्न ! सौरभ ने कधी म्हणून हास्यासह मला गडगडणारा आवाज देणें सोडले नाही, माझा मूड कसाहीं असो ह्याचा मूड नेहमी असाच..

           आमच्या पेशात हसणाऱ्या व्यक्तीला कमजोर, आणी काहीतरी मागणाऱ्या व्यक्तीला किळसवाणा गरीब प्राणी म्हणून पाहिलं जातं.. ह्या सगळ्या अदृश्य नियमात अपवाद असणारा प्राणी म्हणजे हा सौरभ सोहोनी.. रत्नागिरीतील माझ्या उमेदवारीच्या काळात इतके खडकाळ आयुष्य जगताना ह्या खडकात उमललेल्या फुलाला पाहुन मला मनोमन हेवा वाटायचा.. माझ्यापेक्षा पाच ते सात वर्षे सिनिअर असलेल्या ह्या व्यक्तीच कस होईल हीं चिंता मला नव्हती पण  “ वैशंपायन तुम्ही कडक हा एकदम “, अगदी तुमच्या सिनियरशी स्पर्धा करताय,” असां मिश्किल टोला हाणणारा सौरभ.. वेगळीच वल्ली, यामागे माझं कस होईल पुढे, ह्याची चिंता त्याला नक्कीच असावी.. 

               मी रत्नागिरी सोडली आणी हा प्राणी नन्तर मला पुन्हा रत्नागिरीत कधीच दिसला नाही.. नेहमी रत्नागिरी कध्येमध्ये गाठली की माझे नकळत डोळे ह्याच व्यक्तीला शोधात असावेत.. काहीतरी रिकामं रिकामं वाटतं आलय कायम.. पण तो दिसलाच नाही.. कुठे आहे तों,काय आहे, काय करतो, काहींचं माहिती नाही. माझ्या ह्या दगडी आयुष्यात त्याची आठवण काढणं भावनिकतेच लक्षण असल्याने मी मुद्दामूनहून अशी कमजोर बाजू दाखवत नसल्याने कोणाला त्याच्याबद्दल विचारायचा प्रश्नचं नाही.

              हा मागच्या 6 वर्ष नुकताच संपलेला आयुष्यातला काळ आठवताना मोबाईलवर सौरभचा चेहरा बघतोय, तो नाहिये आता, हीं कल्पना करूनच मनोमन कष्टी व्हायला होतंय. कोणताही बॅकअप प्लॅन नसताना लॉ फिल्डला येण म्हणजे माझ्यासारखं सर्किट व्यक्तीच ते करू शकतो, स्वतःच्या मुर्खपणाबद्दल आत्मविश्वास तों हाच.. सौरभ चीं मूर्ती, हसतमुख चेहरा आठवतोय आवाज अगदी जवळून येतोय आणी स्मृतीला ताजा आहे. पण ह्या फिल्डचे आपण नसताना ह्या दुष्टचक्रात अडकलेले आभागी सौरभसारखे निष्पाप,निरागस जीव अशाच पद्धतीने शेवटाला नं जावोत, किमान तरुणाईच नुकसान कमीत कमी होवो अशीच मनोमन ईश्वरचरणी प्रार्थना..


@HRK. Vaishampayan.. 23/07/2024..


Comments